मुंबई ः सदैव शेतकऱ्यांचा पाठीशी म्हणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी सवंग घोषणा केल्या. पण सरकारच्या हातात काय पडले हे विचार करण्यासारखे आहे. या घोषणांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिले आहेत, अशी खंत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षातर्फे मांडण्यात आलेल्या २६० च्या प्रस्तावावर बोलतानाविरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, कधी सततचा पाऊस, कधी गारपिटी, कधी नापिकी यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दारिद्र्य जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांची संभावना होत आहे. सरकारच्या घोषणा सवंग होत आहेत. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कारण मदत जाहीर करूनही सरकारकडून शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये अजून दिलेलेच नाही. ते का दिले नाही, हा संशोधनाचा विषय आहे. विविध प्रकारच्या मदतीपोटी सरकार अजूनही शेतकऱ्यांना १०२२ कोटी ६४ लाख रुपये देणे आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत देते, मात्र त्याची गती फारच संथ आहे, असे म्हणत त्यांनी विविध योजनांचा तपशील दिला. शेतकऱ्याना कर्जमुक्तीचे अजूनही ५९७५ कोटी देणे असल्याचे अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.