मुंबई : भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या अमृत काळामध्ये प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योग आपला अशा प्रकारे ठसा उमटवतील ज्याची कोणासोबतही तुलना करता येणार नाही, असे केंद्रीय वाणीज्य आणि उद्योग, वस्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. ते आज फिक्की फ्रेम्स 2023 मध्ये बोलत होते. भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर नेण्याच्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी या उद्योगाची प्रशंसा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील सरकारचे प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या जागतिक आघाड्यांवर आणि जगाच्या अतिदुर्गम भागापर्यंत पोहोचण्याच्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठबळ आहे, असे त्यांनी सांगितले. 2047 पर्यंत भारत एक विकसित देश बनण्याच्या मार्गावर आहे हा संदेश संपूर्ण जगभर पसरवण्याचे काम प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगाला करता येऊ शकेल, असे ते म्हणाले. अतिशय किफायतशीर दरांमध्ये असामान्य गुणवत्ता आणि कुशल बळासह जगाला आर्थिक विकास आणि व्यापार वृद्धीसाठी अमाप संधी देऊ करणारा भारत म्हणजे जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, असे त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी पद्धतीने अंगिकार केल्याबद्दल त्यांनी या उद्योगाची प्रशंसा केली आणि स्मार्टफोनचा अतिशय वेगाने कॅमेरा म्हणून होत असलेल्या वापराचे त्यांनी उदाहरण दिले. डिजिटल मंचाचा उदय झाल्याने प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योग अतिशय वेगाने मोठ्या प्रमाणात विकास करतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. अवतार सारख्या हॉलिवुड पटांमध्ये सहभागी असलेल्या भारतीय व्हीएफएक्स कंपन्यांची त्यांनी प्रशंसा केली. या क्षेत्राच्या वृद्धीमध्ये स्टार्ट अप्स लक्षणीय योगदान देत आहेत, असे ते म्हणाले.
प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योग जगाला आज नव्या भारताचे दर्शन घडवू शकतो आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतो, नव्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचण्यात देशाला मदत करू शकतो, विचारांवर प्रभाव निर्माण करू शकतो आणि सकारात्मकतेचा प्रसार करू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योग भारताचे सांस्कृतिक राजदूत आहेत आणि भारताची एक वेगळी ओळख या उद्योगांनी निर्माण केली आहे, असे त्यांनी सांगितले. जगभरातील जनता, व्यवसाय आणि देश यांच्यासोबत संलग्न होण्याची आणि विविध संस्कृती आणि परिस्थिती यांचे आकलन चांगल्या प्रकारे करण्याची आणि त्यांचा गौरव करण्याची प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्षमता आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात फिक्की फ्रेम्स हा एक प्रस्थापित मंच बनला असून भारत खऱ्या अर्थाने कशाचे प्रतिनिधित्व करतो त्याचे दर्शन घडवत असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या भारतात प्रत्येक कलाकार स्वप्न पाहू शकतो आणि स्वप्ने पाहणाऱा प्रत्येक जण यश मिळवू शकतो असे त्यांनी सांगितले आणि प्रगती आणि समृद्धीच्या या प्रवासात संपूर्ण देशाचे मनोरंजन, सक्षमीकरण, प्रबोधन आणि प्रेरणा देण्याचे कार्य करणारा एक उद्योग उभारण्याचे प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगाला आवाहन केले.