*नाखवा कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत जाहीर*

Santosh Gaikwad July 10, 2024 10:28 PM


*गुन्हा करणारा कितीही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नाही* 

*वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण* 

मुंबई :- वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही बाब जाहीर केली. 

वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. त्यावर स्पष्टीकरण देताना या प्रकरणात कोण कितिही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यावर आपण ठाम आहोत असेही शिंदे म्हणाले. तसेच या घटनेनंतर आज राजेश शहा यांना पक्षातून पदमुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी ड्रिंक आणि ड्राइव्हची तपासणी आणि गस्त वाढवण्याचे निर्देशही ठाणे, पुणे, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असून ड्रिंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती गुंतलेली असली तरीही तिला पाठीशी घातले जाणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.