एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात मंत्री असलेले छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना २०१६ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. काका-पुतणे तब्बल दोन वर्षे आर्थर रोडच्या तुरुंगात होते. बहुजन समाजाच्या या आक्रमक नेत्यावर कोसळलेले संकट पाहून आमच्यासारख्या अनेक बहुजन प्रेमी लोकांना दु:ख झाले होते. भुजबळांच्या या संकटकाळात दै. ‘शिवनेर’ त्यांच्यामागे पहाडाप्रमाणे उभा ठाकला होता. ते ज्यावेळी तारखेला मुंबई उच्च न्यायालयात येत त्यावेळी आम्ही आवर्जून त्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत असू. इतकेच नव्हे तर आमचे मित्र सुप्रसिद्ध विधिज्ञ डॉ. निलेश पावसकर यांना देखील अनेकदा आमच्यासोबत आम्ही कोर्टात नेले. त्यांनी भुजबळ यांच्या वकिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. भुजबळ काका-पुतणे जामिनावर सुटावेत म्हणून काय युक्तिवाद केला पाहिजे, हे देखील डॉ. पावसकर यांनी भुजबळ यांच्या वकिलांना समजावून सांगितले. आम्ही एवढेच करून थांबलो नाही तर भुजबळांचे एक निकटवर्तीय श्री. दत्ता व-हाडी यांच्यासोबत आम्ही भुजबळ यांच्या सांताक्रुज येथील निवासस्थानी गेलो. तेथे भुजबळ यांच्या पत्नीला, नानी यांना, आम्ही भेटलो. आम्ही नानींना धीर दिला. भुजबळ साहेब आणि समीर लवकरच सुटतील, असे आम्ही त्यांना सांगितले. आमचे दिलासा देणारे बोल ऐकून त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी आले. त्या संकटकालीन परिस्थितीतही नानींनी आम्हाला आग्रहाने टोस्ट सँडविच आणि चहा दिला. आम्ही जड अंत:करणाने नानींचा निरोप घेतला. दरम्यान, भुजबळांच्या ‘विद्वान’ वकिलांनी भुजबळांचे बाहेर असलेले चिरंजीव पंकज यांना कोर्टाच्या तारखांना गैरहजर राहण्यास सांगितले. ते पाहून डॉ. पावसकर यांनी त्या वकिलांची चांगलीच हजेरी घेतली. उद्या कोर्टाने पंकज यांना फरार घोषित करून त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले तर तुम्ही काय करणार? असे त्यांना विचारले. तुमच्याकडे प्लान ए, प्लान बी, प्लान सी आहे का? असेही त्यांना विचारले. त्यावर ते वकील निरुत्तर झाले. हे सारे भुजबळांसमोर घडले. त्यावर कठोर वाटणारे भुजबळ देखील गहिवरले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, ‘मी तुरुंगात, समीर तुरुंगात. आता पंकज देखील तुरुंगात गेला तर मला हार्ट अॅटॅक येईल.’ हे ऐकून डॉ. पावसकर म्हणाले, ‘साहेब, घाबरू नका. पंकजला अटक होणार नाही. फक्त त्याला कोर्टाच्या तारखांना हजर राहायला सांगा.’ त्यानंतर पंकज यांनी कधीही कोर्टाची तारीख चुकवली नाही. त्यांना अटक देखील झाली नाही. सारांश, भुजबळ यांच्या प्रेमापोटी आम्ही हे सारे केले. त्यावेळी ‘आम्ही मराठा, ते माळी’ असा विचार चुकूनही आमच्या मनात आला नाही. सुटका झाल्यानंतर पुण्याच्या सभेत पहिले भाषण करताना भुजबळ म्हणाले, ‘माझ्या सुटकेसाठी काही पत्रकारांनी मला मदत केली. त्यांचा मी आभारी आहे.’
आज हे सारे आठवण्याचे कारण असे की, ईडीकडून भुजबळांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्याविरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाला कळविले आहे. दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी न्यायालयाने ही याचिका मागे घेत असल्याची ईडीची मागणी मान्य केली आहे.
गेले काही दिवस आरक्षणाच्या विषयावरून छगन भुजबळ मराठा समाजाला लाखोल्या वाहात होते. मंत्र्याला न शोभणारी वक्तव्ये करीत होते. मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावणारी भूमिका घेत होते. भुजबळांना पिसाळलेले कुत्रे चावले की काय असा संशय यावा, इतके ते पिसाळले होते. पण त्यांच्या या भूमिकेमागील रहस्य आता उघड झाले आहे. बहुजन समाजात भांडणे लावण्याची ‘सुपारी’ त्यांना कोणत्या भटजींनी दिली हे देखील स्पष्ट झाले आहे. काल दुपारी कोर्टाने ईडीची केस मागे घेण्याची मागणी मान्य केली. तेव्हाच आम्ही मनाशी म्हटले, ‘भटा’ची सुपारी, ‘माळी’ मुक्त दुपारी !’ महात्मा फुले हे ईश्वर मानत नव्हते. ते निर्मिक मानत होते. आम्ही महात्मा फुले आणि निर्मिक या दोघांनाही मानतो. म्हणून आम्ही म्हणतो, ‘छगन भुजबळ, निर्मिक तुमचे भले करो!’
-नरेंद्र वि.वाबळे