शिंदे गटाच्या दाव्यावर केदार दिघेंचे जोरदार प्रत्युत्तर म्हणाले, “राज, शिंदे, राणे देखिल त्या अर्ध्या तासात भेटून गेले होते मग संशयाची सुई...
SANTOSH SAKPAL
April 06, 2023 10:10 PM
ठाणे : शिंदे गटाच्या नेत्या, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी “उद्धव ठाकरे बघून गेल्यावर अर्ध्या तासात आनंद दिघेंचा मृत्यू झाला होता,” असा गंभीर आरोप केला. यानंतर एकच खळबळ उडाली. आता आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी या आरोपावर शिंदे गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. ते गुरुवारी (६ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
केदार दिघे म्हणाले, “आनंद दिघेंचा मृत्यू झाला तेव्हा अनेक नेते त्यांना भेटून गेले. त्यात उद्धव ठाकरे, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अनेक स्थानिक नेत्यांचा समावेश होता. हे धर्मवीर चित्रपटातही आपण पाहिलं. मिनाक्षी शिंदेंना संशय निर्माण करायचा असेल तर भेटून गेलेल्या प्रत्येकाकडे संशयाची सुई जाईल.”
“या २२ वर्षात ही सर्व मंडळी याच शिवसेनेत होते. त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. या लोकांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशाने, त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पदं उपभोगली. हे सर्व उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या पक्षातूनच नगरसेवक, आमदार, मंत्री झाले. आता २२ वर्षांनंतर त्यांना हे आठवतं आहे. मला वाटतं हे स्वार्थी राजकारण सुरू आहे”, असं मत केदार दिघे यांनी व्यक्त केलं.
शिंदे गटाच्या नेत्या, माजी महापौर मीनाक्षी शिंदे म्हणाल्या होत्या, “आनंद दिघेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात येऊन गेल्यानंतर अर्ध्या तासात आनंद दिघेंना मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत ठाणेकरांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये.”
“रोशनी शिंदेंची प्रकृती ठीक असल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तरीही रोशनी शिंदेंना सातत्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, गंभीर भासवले जात आहे. गर्भवती नसताना, आहे म्हणून सांगितले जाते. त्यांना बोलता येत नसल्याचे सांगितले जात आहे. हे का चालले आहे, याचे गूढ अद्यापही उलगडले नाही. एकीकडे आजारपण दाखवले जात असताना, उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे,” असे मीनाक्षी शिंदेंनी म्हटले आहे.