आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी मिळणार बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार !
Santosh Gaikwad
January 30, 2024 07:24 PM
सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची घोषणा
मुंबई, दि. ३० : आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार आणि कर्मचाऱ्यांकरिता यंदापासून बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार दिला जाणार आहे. सन २०२३-२४ या वर्षापासून आरोग्य पुरस्कार राज्यात सुरू केला असून उत्कृष्ट काम करणारी स्वयंसेवी संस्था, उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार आणि कर्मचाऱ्यां दिला जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला, उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन डॉक्टरांना, उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला आणि ५ कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जाईल. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये असेल. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आयोजित केला आहे. सन २०२३-२४ या वर्षात डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही, असे शासन निर्णयात नमूद आहे.