शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करणार, पुरस्काराचे २५ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ; आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घोषणा !

Santosh Gaikwad April 16, 2023 04:23 PM

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित !

नवी मुंबई :  ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेबांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार, स्मृती चिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यावेळी देण्यात आला. पुरस्कार सोहळ्यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तेव्हा त्यांनी पुरस्कार म्हणून मिळालेलं २५ लाख रुपयांचं मानधन आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देत असल्याची घोषणा केली.


नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,  सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर आणि  लाखोंच्या संख्येने श्री सेवकही या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित  होते.


आप्पासाहेब पुढे म्हणाले की, मानवता धर्मात प्रत्येक मनुष्याने उभं रहावं. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहीन. माझ्यानंतर माझाा मुलगा हे कार्य पुढे नेईन. मला विश्वास आहे. सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करेल, असंही धर्माधिकारी म्हणाले.

   

समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय : अमित शहा

अमित शाह म्हणाले की, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देऊन सरकारनं योग्य व्यक्तिचा सन्मान केला आहे. याबद्दल मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केल्याचे अमित शाह यावेळी म्हणाले.  मी फक्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आलो असल्याचे शाह म्हणाले.  समाजसेवकाच्या सत्काराला आलेला एवढा जनसमुदाय माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहत आहे.लक्ष्मीची कृपा एका कुटुंबावर अनेक वर्षे राहते. एकाच कुटुंबात अनेक वीर एकानंतर एक जन्म घेतात. आणि वीर कुटुंब तयार होते. पण, समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांपर्यंत राहतो, हे पहिल्यांदाच पाहिले आहे. पहिल्यांदा नानासाहेब नंतर आप्पासाहेब आता सचिनभाऊ आणि त्यांचे दोन बंधू हे संस्कार पुढे नेत आहेत,” असं शाह यांनी म्हटलं. त्याग, समर्पण आणि सेवेच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी मोठं काम केलं आहे, असं म्हणत अमित शहांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कामाचे कौतुक केले आहे. समाजसेवेचे संस्कार तीन पिढ्यांमध्ये राहतात हे मी प्रथमच पाहत आहे. आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सरकारने लाखो लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले.


उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम धर्माधिकारी कुटुंबीयांनी केले :  मुख्यमंत्री

उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेबा धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहोत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी यावेळी काढले. राजकीय सत्तेपेक्षा अध्यात्मिक शक्ती मोठी असते त्याचे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. राजकीय अध्यात्मिक अधिष्ठानाची जोड, आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते त्याचा जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतो आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी असून याचे रेकॉर्ड मोडायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आप्पासाहेबांचे श्री सदस्यच मोडू शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, हुंडा यासारख्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे काम नानासाहेबांनी, आप्पासाहेबांनी केलं. मोह, माया, मत्सर याच्यापासून आपण दूर कसं जाऊ याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली. सरकार म्हणून काम करीत असताना आम्ही देखील आप्पासाहेबांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, असे मुख्यमंत्री  शिंदे यांनी यावेळी सांगितले.