ज्येष्ठ नागरिकांनी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Santosh Gaikwad July 11, 2024 09:58 PM


 मुंबई, दि. ११ : राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

  राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरिता, तसेच मनः स्वास्थ केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना" राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

  सन २०२४-२५ या वर्षापासून वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी या https://tinyurl.com/ue७d९sc  लिंकवर जाऊन अर्जाची प्रिंट काढून दिलेली माहिती भरुन  अर्ज कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ या कार्यालयात  करावा.

   या योजनेसाठी लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत, योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरीक, ज्या नागरिकांनी दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक, पात्र समजण्यात येतील. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न  २ लाखाच्या आत असावे. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स हे निकष अर्जदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
****