पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या काळात : शरद पवार

Santosh Gaikwad August 02, 2023 12:46 AM


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी पुण्यात प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पवार यांनी मोदी यांचे अभिनंदन केले तर पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरांयाच्या काळात झाला याची आठवण पवार यांनी करून दिली. शरद पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखाने केली. शिवरायांचा जन्म आणि बालपण पुणे जिल्ह्यात गेलं. याचठिकाणी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हा पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे या देशात अनेक राजे होऊन गेले पण त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचे. पण शिवाजी महाराजांनी उभारलेलं राज्य भोसल्यांचं राज्य नव्हे तर रयतेचं राज्य होतं, हिंदवी स्वराज्य होते. अलीकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता, त्याची मोठी चर्चा झाली. पण लाल महालात पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांच्या काळात झाला होता, ही गोष्ट विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.


शरद पवार यांचा मुख्य रोख छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या देशासाठीच्या योगदानावर राहिला. पवार म्हणाले की,  टिळक पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. टिळक स्मारकाने या पुरस्कारासाठी मोदींची निवड केली. यापूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार हा इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, शंकर दयाल शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब देवरस, मनमोहन सिंह यांना मिळाला होता. या नेत्यांच्या पंक्तीत नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला, याचा आनंद आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले.


                      यानंतर शरद पवार यांनी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख केला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध सामान्य माणसांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रकारितेचा शस्त्र म्हणून वापर केला. त्यांनी केसरी आणि मराठा ही दैनिकं सुरु केली, असे शरद पवार यांनी म्हटले.