विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
Santosh Gaikwad
July 17, 2024 11:34 AM
पंढरपूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली.
यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करणे हे आपले सौभाग्य असल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजेनंतर व्यक्त केले.
यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे पांडुरंगाच्या चरणी मागितल्याचे सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश आणि मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते.