मध्यप्रदेश, राजस्थानसह ५ राज्यात निवडणुका जाहीर : ३ डिसेंबरला निकाल !
Santosh Gaikwad
October 09, 2023 04:00 PM
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात म्हणजे ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. ३ डिसेंबरला सर्व राज्यातील मतमोजणी पार पडेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ राज्यांमध्ये ६७९ जागांवर १६ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ६० लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मध्य प्रदेशात ५.६ कोटी, राजस्थानमध्ये ५.२५ कोटी, तेलंगणात ३.१७ कोटी, छत्तीसगडमध्ये २.३ कोटी आणि मिझोराममध्ये ८.५२ लाख मतदार आहेत. या राज्यांमध्ये १.७७ लाख मतदान केंद्रे असणार आहेत.
मध्यप्रदेश विधानसभेचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी संपत आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले होते. परंतु मार्च २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्ष मध्ये सामील झाले. यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पडले आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात भाजपने सरकार स्थापन केले आणि शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले. २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशात पहिल्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ १४ जानेवारी २०२४ रोजी संपत आहे. राज्यातील २०० जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन केले आणि अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले.
छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. विधानसभेची शेवटची निवडणूक नोव्हेंबर २०१८ मध्ये झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आणि भूपेश बघेल राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. छत्तीसगड विधानसभेत एकूण ९० जागा आहेत.
मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील शेवटच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर झोरमथांगा मुख्यमंत्री झाले होते. ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये एकाच टप्प्यात म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
तेलंगणा विधानसभेचा कार्यकाळ १६ जानेवारी २०२४ रोजी संपत आहे. ३० नोव्हेंबर रोजी ११९ जागांसह तेलंगणात मतदान होणार आहे. डिसेंबर २०१८ मध्ये येथे शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि तेलंगणा राष्ट्र समितीने राज्यात सरकार स्थापन केले. त्याचे नाव बदलून आता भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले. चंद्रशेखर राव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत.
कोणत्या राज्यात किती मतदार आहेत?
मध्य प्रदेश - ५.६ कोटी
राजस्थान - ५.२५ कोटी
तेलंगणा - ३.१७ कोटी
छत्तीसगड - २.०३ कोटी
मिझोराम - ८.५२ लाख
राज्यनिहाय मतदान केंद्र
मध्यप्रदेश - ६४,५२३ मतदान केंद्र
राजस्थान - ५१,७५६ मतदान केंद्र
छत्तीसगड- २४,१०९ मतदान केंद्र
तेलंगणा - ३५,३५६ मतदान केंद्र
मिझोरम - १२७२ मतदान केंद्र