बांबू राजकीय चर्चेत, दोन्ही शिवसेनेचे वार - पलटवार !

Santosh Gaikwad June 24, 2024 07:50 PM


मुंबई : सकाळी उठून भोंगे वाजवणा-यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे असे वक्तव्य करीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र राऊतांनीही त्यावर प्रतिउत्तर देत पलटवार केला आहे.  लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळयांनी मिळून महायुतीला बांबू लावला विधानसभा निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल आता स्वप्नातही त्यांना बांबू दिसतो असा पलटवार राऊतांनी केला. अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपल्याने दोन्ही शिवसेनेत वार पलटवार शाब्दीक चिखलफेक सुरू झाली असतानाच आता राजकीय वर्तुळात बांबू चर्चेत आला आहे.

रविवारी बांबू संवर्धनाविषयीच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता काही लोकांना बांबू लावण्याची आवश्यकता असल्याचं विधान केलं होतं, त्यानंतर राऊत यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.  राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी अवैध सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना बांबू लागला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून बांबू घातलेलं आहे तो काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आतमध्ये घुसलेला बांबू खेचून काढायचा की ऑपरेशन करुन काढायचा, याचा अभ्यास सध्या देवेंद्र फडणवीस करत आहेत. या अभ्यासावर त्यांना कदाचित एखादी बोगस डिग्रीही मिळू शकते. कदाचित मोदी-शाहाच त्यांना बांबू घालतात, हे बघावे लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. सकाळच्या भोंग्याला बांबू लावला पाहिजे. भोंगा वाजल्यानंतर लोक चॅनल बदलायला लागले आहेत. शरद पवार आणि काँग्रेसने तुम्हाला बांबू लावला आहे. दुसऱ्यांचे बांबू बघू नका, तुमच्याकडे आला तर त्रास होईल, असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाला बांबू लागला. आमचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षाही चांगला आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.