बारामतीत कुणाचे बारा वाजणार : विजय शिवतारे अपक्ष लढण्यावर ठाम, १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार !
Santosh Gaikwad
March 24, 2024 07:28 PM
बारामती : शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बारामती मतदार संघातील लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडीत पक्ष हायजॅक केल्यानंतर आता बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असा नणंद विरूद भावजय असा सामना रंगणार आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करूनही शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामती लढण्यावर ठाम असून, येत्या बारा तारखेला, बारा वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे बारा वाजवणार अशी गर्जना शिवतारेंनी केली आहे. त्यामुळे बारामतीत कुणाचे बारा वाजणार अशीच चर्चा रंगली आहे.
विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी हट्ट साडलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची मनधरणी करूनही शिवतारे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. शिवतारेंनी कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि दि १ एप्रिलपासून प्रचाराला सुरूवात करणार असल्याचं सांगितलं. मला बारामतीतूनच नाही तर महाराष्ट्रातून फोन येत आहेत. काहीजण म्हणतात मी शरद पवारांचा हस्तक झालोय. पण मी घराणेशाही आणि झुंडशाहीच्या विरोधात लढतोय, असं विजय शिवतारेंनी म्हटलं. त्यावेळी 'बारा तारखेला बारा वाजता फॉर्म भरणार आणि पवारांचे बारा वाजवणार', असं म्हणत शिवतारेंनी दंड थोपटले आहेत.
दरम्यान, अजित पवारांची पत्नी म्हणून आम्ही मतदान का करायचं? अशी विचारणाही त्यांनी केली. 2024 ची विधानसभा हे सगळे वेगळे लढतील असाही दावा त्यांनी केला. अजित पवार हे जिंकू शकत नाहीत असंही ते म्हणाले. या लढाईत मी विभीषण आहे तर रावण कोण असेल हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला होता. बारामतीत लोकशाहीला मानणाऱ्या आणि घराणेशाही, कुटुंबशाही, साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला होता.