भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू

SANTOSH SAKPAL April 30, 2023 06:19 PM

भिवंडी: भिवंडीतल्या वळपाडा परिसरात रविवार हा घातवार ठरला, ३० एप्रिल रोजी येथील 3 मजली इमारत कोसळून मोठा अपघात झाला. त्यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 जणांपैकी 14 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही बचावकार्य सुरुच आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असे ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचे नाव आहे. पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या. दुर्घटनाग्रस्त भिवंडी इमारतीत तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचे गोडाऊन होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनविण्यात आल्या होत्या. ज्यात भाडेतत्वावर नागरिक राहत होते. इमारतीवरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. ज्यात 27 ते 30 खोल्या बनविण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे, या कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने ही इमारत कोसळल्याचे बोलले जात आहे.