बिली जीन किंग कप 2025 टेनिस स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची सुहाना सफर

Santosh Sakpal April 04, 2025 09:35 PM

 पुणे, : महाराष्ट्र राज्य लॉन संघटनेच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पीएमडीटीए यांच्या सहकार्याने बिली जीन किंग कप 2025 आशिया ओशनिया गट 1 टेनिस स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय महिला संघाला देशातील अग्रगण्य मसाल्यांचे उत्पादक सुहाना मसाले यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. हि स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस संकुलात 8 ते 12 एप्रिल 2025 या कालावधीत रंगणार आहे.

भारतात सुमारे दशकभरानंतर, महाराष्ट्रात 25 वर्षानंतर आणि पुण्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत केवळ दुसऱ्यांदा प्ले ऑफ गटासाठी पात्र ठरण्याकरिता भारतीय महिला संघ प्रयत्नशील आहे. 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाबरोबरच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा पाठिंबा लाभलेल्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाला भारतातील अग्रगण्य मसाल्यांचे उत्पादक पुणे स्थित सुहाना मसाले यांचा पाठिंबा लाभल्यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य उंचावणार आहे. 

स्वतः टेनिस पटू असणारे सुहाना समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया म्हणाले की, गेल्या तीन दशकांपासून प्रवीण करंडक स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भारतीय ज्युनियर टेनिस क्षेत्राला पाठिंबा देत आहोत. आता, आमच्या पुणे शहरात होत असलेल्या बिली जीन किंग कप आशिया ओशनिया गट 1 पात्रता स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाला पाठिंबा देताना आम्हांला अभिमान वाटत आहे.

माजी राष्ट्रीय मानांकित टेनिस पटू व सुहाना समूहाचे संचालक विशाल चोरडिया म्हणाले की, भारतीय महिला संघाला प्रायोजित करताना आम्हाला आनंद, अभिमान आणि सन्मान वाटत आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून भारतीय महिला संघ जागतिक गट प्ले ऑफ साठी पात्र ठरेल असा मला विश्वास वाटतो. 

दरम्यान याचवेळी बिली जीन किंग कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाच्या नव्या किटचे अनावरण करण्यात आले. 

स्पर्धा संचालक आणि एमएस एलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व अव्वल एकेरी खेळाडू व आशियाई कांस्य पदक विजेती अंकिता रैना हिच्याकडे सोपविण्यात आले असून या संघात सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती व वैदेही चौधरी यांच्यासह डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या दुहेरी विशेषज्ञ प्रार्थना ठोंबरेचा समावेश आहे. अनुभवी प्रार्थनामुळे भारतीय संघाची ताकद वाढणार आहे. या संघात सनसनाटी युवा खेळाडू माया राजेश्र्वरण या केवळ 15 वर्षीय खेळाडूचा समावेश राखीव खेळाडू म्हणून करण्यात आला असून तिनेही फेब्रुवारी मध्ये पार पडलेल्या डब्ल्यूटीए मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत अप्रतिम कामगिरी बजावली होती. 

पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी टेनिस प्रेमींना मोफत प्रवेश असणार असून अत्यंत रोमांचकारी लढती त्यांना यावेळी अनुभवता येणार आहे. 

बिली जीन किंग कप 2025 स्पर्धेसाठी माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू पुण्याची राधिका तुळपुळे- कानिटकर हिची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राऊंड रॉबिन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघासमोर न्यूझीलंड, चायनीज taईपई, कोरिया रिपब्लिक, थायलंड आणि हाँग काँग चायना यांचे आव्हान असणार असून स्पर्धेतील अव्वल दोन संघ यावर्षी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या प्ले ऑफ साठी पात्र ठरणार आहेत. 

गतवर्षीच्या स्पर्धेत चीन व दक्षिण कोरिया पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागल्याने भारतीय महिला संघाची पात्रता फेरी थोडक्यात हुकली होती. न्यूझीलंड विरुद्ध निर्णायक लढतीत केवळ एका विजयाची गरज असताना भारतीय महिला संघाला अखेरच्या क्षणी 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. यंदा मात्र घरच्या मैदानावर आणि मायदेशातील पाठिंब्यामुळे भारतीय महिला संघाकडून सरस कामगिरीची अपेक्षा आहे. 

भारतीय महिला संघाचे कर्णधार विशाल उप्पल म्हणाले की, आम्ही या स्पर्धेसाठी आमचा सराव व पूर्वतयारी याआधीच सुरू केली आहे. स्पर्धेसाठी खेळाडूना अखेरच्या क्षणापर्यंत तंदुरुस्त आणि चपळ राखणे व त्यांचे आरोग्य सांभाळणे हे आमच्यासमोरील आव्हान आहे. सर्व खेळाडू एकमेकांशी मिळून मिसळून असून सराव सत्रातही उत्साह व जोम जाणवत आहे. 

पुण्यातील ऋतुजा कुलकर्णी व अपूर्वा कुलकर्णी या दोन्ही फिजिओथेरपीस्ट ची भारतीय संघासाठी नियुक्ती केल्याबद्दल त्यांनी एआयटीए व एमएसएलटीए यांचे आभार मानले. 

एमएसएलटीए यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने डीडी स्पोर्टस वाहिनीवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा विभागाबरोबरच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा पाठिंबा लाभलेल्या या स्पर्धेला बिसलेरी, शिव-नरेश, मणिपाल हॉस्पिटल आणि डनलॉप यांचेही सह प्रायोजकत्व लाभले आहे. 

भारतीय संघ पुढीलप्रमाणे:

खेळाडू - अंकिता रैना, प्रार्थना ठोंबरे, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मिका भामीदीप्ती, वैदेही चौधरी, माया राजेश्वरन रेवती (राखीव)

कर्णधार - विशाल उप्पल

प्रशिक्षक - राधिका तुळपुळे - कानिटकर 

फिजिओस - ऋतुजा कुलकर्णी आणि अपूर्वा कुलकर्णी