नवनीत राणा कमळावर लढणार, अमरावतीत बंडाचे निशाण ?
Santosh Gaikwad
March 27, 2024 08:52 PM
अमरावती : भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेले प्रहारचे बच्चू कडू यांनी राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे नाव रेटले जात होते. अमरावतीची जागा शिवसेनेची असल्याने अडसूळ या जागेवर दावा करीत होते. त्यामुळे अडसूळ आता कोणती भूमिका घेणार, बंडखोरी करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून महायुतीत तेढ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला नाही त्यामुळे राणांना उमेदवारी मिळणार कि नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला हेाता. स्थानिक भाजप कार्यत्यांकडूनही राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र तरीसुध्दा भाजपने अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेले प्रहारचे बच्चू कडू यांनीही राणा यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध दर्शवला होता. परंतु हे सगळे मुद्दे निकालात काढून भाजप पक्षनेतृत्वाने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. राणांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्या लवकरच भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील.
नवनीत राणा गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अमरावतीतून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. परंतु एक-दीड वर्षातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली. गेली चार वर्षे त्या सातत्याने भाजपला अनुकूल भूमिका घेत राहिल्या. तेव्हापासूनच त्या २०२४ ची लोकसभा भाजपकडून लढतील, हे निश्चित मानले जात होते.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चार अपक्ष खासदार विजयी होऊन संसदेत पोहोचले होतं. नवनीत राणाही त्यापैकीच एक आहेत. अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणा यांनी ३६,९५१ मतांनी विजय मिळवला होता.
बच्चू कडू यांचा राणांना विरोध
दरम्यान, नवनीत राणा यांच्या उमेदवारीला प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचा विरोध आहे. ''आम्ही अमरावतीची लोकसभा ही मैत्रीपूर्ण लढत लढत आहोत. सगळ्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की, ज्या राणांनी आपल्याला इतकं अपमानित केलं. यातच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, राजकारणात आपण पुन्हा शून्य झालो तरी चालेल, मात्र इतकी शरणागती आपण पत्करायची नाही. राणांचा प्रचार करायचा नाही, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता आहे असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलय.