भाजपची दहावी यादी जाहीर, मुंबईतील खासदारांची धाकधूक वाढली !

Santosh Gaikwad April 10, 2024 06:50 PM

 

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची 10 वी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राबाहेरील उमेदवारांचा समावेश आहे. पण अद्याप राज्यसह मुंबईतील भाजपच्या काही विद्यमान खासदारांची नाव जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट करत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत मिहीर कोटेजा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र 10 याद्या जाहीर झाल्या तरी अद्याप विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा पत्ता लागलेला नाही, त्यामुळे त्यांचीही धाकधूक वाढली आहे. परिणामी अनेक चर्चांना उधाण आले आहे.

भाजपने मंगळवारी उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली. या 10 व्या उमेदवार यादीनुसार, चंदीगडमधून विद्यमान खासदार किरण खेर आणि अलाहाबादमधून विद्यमान खासदार रिटा बहुगुणा जोशी यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. किरण खेर यांच्या जागी संजय टंडन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अलाहाबादमधून रीता बहुगुणा यांच्या जागी नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.