भाजपची मोठी रणनिती : मुंबईतून माधुरी दिक्षीत, अक्षयकुमार यांना उमेदवारी ?
Santosh Gaikwad
March 09, 2024 02:43 PM
मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. निवडणुकीच्या जागा वाटपाची तयारी सुरू आहे. काही जागांवरून महायुतीमध्ये खलबंत सुरू आहेत. भाजपने पहिल्या यादीत अभिनेते आणि अभिनेत्रींना उमेदवारी दिली असतानाच, आता मुंबईतून बॉलिवूड स्टार माधुरी दिक्षीत आणि अक्षयकुमार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची मोठी रणनिती भाजपकडून आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणुका आल्या कि बॉलिवूड स्टार्सना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरविले जाते हे आतापर्यंत आपण पाहिलेचे आहे. मुंबईतून दोन बॉलिवूड स्टार्सना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा विचार भाजपकडून केला जात आहे. मुंबई.
लोकसभेच्या सहापैकी पाच जागांवर भाजप तर एका जागेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवू शकते. दरम्यान, मुंबईतील लोकसभेच्या सर्व ६ जागा भाजपला लढवायच्या असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, एका जागेसाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे.
खासदार पूनम महाजन यांच्या जागेवर आशिष शेलार यांना उमेदवारी मिळू शकते असे सुत्रांकडून समजते. शिवसेनेच्या ताब्यात असलेली दक्षिण मुंबईची जागा भाजप ताब्यात घेणार असून, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना येथून तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर तर मनोज कोटक यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
महायुतीत तिढा असलेल्या १७ जागा कोणत्या?
ठाण्याची जागा गेल्यावेळी शिवसेनेनं जिंकलेली इथं भाजपनं दावा केला आहे. पालघर, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता इथं भाजपनं दावा केला आहे. मावळची जागा सेनेनं जिंकली होती, तिथं भाजप आणि राष्ट्रवादीचा देखील दावा आहे. सातारा लोकसभा गेल्यावेळी राष्ट्रवादीनं जिंकली होती या जागेवर भाजपचा दावा आहे.
कोल्हापूर, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ या जागा शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या, इथं भाजपनं दावा सांगितलेला आहे. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर भाजपनं जिंकलेलला होता या ठिकाणी राष्ट्रवादीचा दावा आहे. उस्मानाबाद (धाराशिव) या मतदारसंघात शिवसेनेनं विजय मिळवला होता, या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा असून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो. अमरावती मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ पराभूत झाले होते, ती जागा भाजपला हवी आहे. परभणीची जागा शिवसेनेनं जिंकलेली होती. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) च्या जागेवर सेना लढली होती. आता तिथं भाजपनं दावा केला होता.
--------------