लातूरसह तीन जागांवरील उमेदवार भाजप बदलणार ?

Santosh Gaikwad March 25, 2024 03:39 PM



लातूर : लातूर लोकसभा मतदार संघातून खासदार सुधाकर श्रृंगारे यांना भाजपने पून्हा उमेदवारी दिली आहे. लातूर लोकसभा मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असताना पुन्हा सुधाकर शृंगारे याना उमेदवारी दिल्याने याचाच फायदा उठवित  काँग्रेसने  उच्च शिक्षित डॉ.शिवाजी काळगे याना उमेदवारी दिल्याने भाजपला ही निवडणूक डोकेदुखी ठरते कि काय अशी चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.  तसेच भाजप महाराष्ट्रातील चार उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये लातूर,वर्धा,जळगाव,माढा या जागांचा समावेश असल्याचे समजते. 

लातूर लोकसभा ही कायम उच्चशिक्षित उमेदवारांची राहिली आहे या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रतिनिधींत्व केले आहे..लातूर एक सुशिक्षित असलेला मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात आता काँग्रेस उमेदवारींमुळे रंगत वाढली असून, सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित अशीच चर्चा लातूरकरांमध्ये सुरू आहे. जिल्ह्यातील  नेतेमंडळी सुद्धा खाजगीत उमेदवार बदलाच्या बातम्यांना दुजोरा देताना दिसत आहेत. 
 
गेल्या पाच वर्षात खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या विकास कामांचे प्रगती पुस्तक समाधानकारक नाही. पोस्टर बॅनरबाजी करणारे खासदार म्हणूनच विरोधकांकडून टीका केली जायची. मतदारांसह स्थानिक कार्यकत्यांमध्येही नाराजीचा सूर ऐकायला मिळत होता. त्यामुळे लातूरला नवीन चेहरा मिळेल अशी चर्चा रंगली होती. तर उमेदवारी मिळेल की नाही याची धाकधूक खासदार श्रृंगारेंना होती. मात्र पक्षाने पून्हा श्रृंगारेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या एका गोटात नाराजीचा सूर उमटला आहे.  जिल्ह्याची आजवरची उच्चशिक्षित परंपरा आणि राजकीय समिकरण पाहता  काँग्रेसने उमेदवार लिंगायत,उच्चशिक्षित आणि नामवंत डॉक्टर दिल्याने भाजपच्या उमेदवाराचा कसा प्रभाव लागेल अशी चर्चा पक्षातच ऐकायला मिळत आहे.   

 भाजपला ४०० पार करायचे असेल तर महाराष्ट्रातील चार ते पाच जागांवरील उमेदवार बदलण्याची चर्चा आता पक्षात सुरू आहे. त्यामध्ये लातूर आघाडीवर असून वरिष्ठांनी नवीन उच्चशिक्षीत उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपच्या गोटातून सुरू आहे.  भाजपच्या केंद्रीय धोरणांनुसार ४०० पार करायचे असेल तर पुन्हा नव्याने या मतदारसंघाच्या उमेदवारीचा विचार भाजप करेल काय ? आणि तो ही सुशिक्षित उमेदवार देऊन काँग्रेसससमोर  आव्हान उभे करेल काय ?असेच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. लातूरमध्ये उमेदवार बदलाच्या मागणीमुळे खासदार श्रृंगारेंची धाकधूक वाढली आहे.