बालकांसंदर्भात गैरप्रकार केलेल्या संस्थांची नावे काळ्या यादीत टाका - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश !
Santosh Gaikwad
August 08, 2023 08:14 PM
मुंबई, दि. ८ : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तसेच ज्या संस्थांमध्ये बालकांसंदर्भात गैरप्रकार घडले आहेत अशा संस्थांची नावे काळ्या यादीत टाकण्यात यावीत असे निर्देश तटकरे यांनी दिले.
राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार श्रीवास्तव, आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव शरद अहिरे, सह आयुक्त राहुल मोरे बैठकीत उपस्थित होते.
बालकांसाठी अशासकीय संस्था तसेच शासकीय अनुदानावर सुरू असलेल्या संस्थांच्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कार्यप्रणाली तयार करावी, त्यांची तपासणी करून दर तीन महिन्याला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बालकांना चांगल्या प्रतीचे खाद्य मिळावे यासाठी मानक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. कार्यरत असलेल्या बालगृहांच्या संस्थाद्वारे मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख करण्यावर जास्त भर देण्यात यावा, बालसंगोपन योजनांसंदर्भात जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री तटकरे यांनी दिल्या. तसेच, बालगृहांतील रिक्त जागांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
०००