कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांचे पालिका प्रवेशद्वारा बाहेर ठिय्या आंदोलन !

Santosh Gaikwad July 11, 2023 10:56 PM


मुंबई : मृत पावलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कामगाराना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, ग्रॅच्युटी, पेंशन आदी संदर्भात आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी भेट न दिल्याने संतप्त झालेल्या मुंबई महापालिकेचा कचरा वाहतूक कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारा बाहेर ठिय्या आंदोलन केले.  


कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे रानडे यांनी सांगितले की, कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या २७०० कामगारांना मुंबई महानगर पालिकेत काम केलेल्या २४० दिवसा पासून कायम कामगार म्हणून दि. ७/४/२०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने  घोषित केले. त्या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकने केली नाही, म्हणून कचरा वाहतूक श्रमिक संघाने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका २०१८ मध्ये दाखल केली. दि ५ जुलै २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत या आदेशाची अंमबजावणी केलेली नसल्याचे  पालिकेतर्फे वरिष्ठ वकील नाडकर्णी यांनी न्यायालयाला कळविले. न्यायालयाने तसे प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले. पण वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे रानडे यांचे म्हणणे आहे.


 मृत पावलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या १३२ कामगाराना अनुकंपा तत्त्वावर नोकरी, ग्रॅच्युटी, पेंशन  निकाल लागून ६ वर्षे झाली तरी मिळालेली नाही. त्यामुळे कामगार पालिका आयुक्त इकबलसिह चहल यांना भेटायला गेले होते. न्यायालयात निवेदन केल्याप्रमाणे नियुक्ती पत्र द्या असे मागणी करण्यात आली मात्र आयुक्तांनी कामगारांना भेट दिली नाही. ते बाहेर निघून गेले. त्यामुळे आयुक्त येई पर्यंत बसून राहण्याचा आणि नियुक्ती पत्र, पेंशन घेऊनच घरी जाऊ असा निर्णय कामगारांनी घेतल्याने पालिकेच्या प्रवेश द्वाराबाहेर ठिय्या आंदोलन छेडण्यात आल्याचे रानडे यांनी सांगितले.