मुंबई : मुंबई महानगरपालिका आरोग्य क्षेत्रात आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे ५ हजार ५७५ 'आशा' आरोग्य सेविकांची कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुरु केली आहे.
मुंबईतील नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने व दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने उपाययोजना व सेवा-सुविधा वाढ केली जात आहे. मुंबईकर नागरिकांना त्यांच्या घरानजीक व सहजपणे आरोग्य सेवा मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने सुरु केलेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्यानंतर, आता वस्ती पातळीवर गृहभेटीद्वारे राबवावयाच्या आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई महानगरासाठी एकूण ५ हजार ५७५ आशा आरोग्य सेविकांची कंत्राटी व मोबदला तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्ज मागविले आहेत. या आशा सेविकांना दरमहा सहा हजार रूपयेपर्यंत कामावर आधारित मोबदला तत्त्वावर मानधन रूपात मिळणार आहे.
सद्यस्थितीत साधारण १ हजार ०८८ आशा सेविका, तर २ हजार ८०० आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची गरज लक्षात घेता, आरोग्य केंद्रात १ हजार ते १२०० लोकसंख्येसाठी व अंदाजे २५० घरांसाठी एक अशा पद्धतीने या आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात येणार आहे. आशा सेविकांना प्रामुख्याने वस्ती पातळीवर गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असेल. तसेच नागरिकांमध्ये असलेले विविध आजारांचे रूग्ण, गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत प्रबोधनाची तसेच उपाययोजनांचीही जबाबदारी असणार आहे.
आशा सेविकांचे निवडीचे निकष विचारात घेता, आशा स्वयंसेविका महिलांची वयोमर्यादा २५ ते ४५ वर्ष या दरम्यान असावी. इच्छुक महिला उमेदवार साक्षर व किमान १० वी पर्यंत औपचारिक शिक्षण पूर्ण झालेले अपेक्षित आहे. त्यांच्याकडे नेतृत्व गुण आणि समुदायाशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे. महत्वाचे म्हणजे इच्छुक आशा स्वयंसेविका उमेदवार या संबंधित विभागातील शक्यतो जवळ निवासस्थान असणाऱया अपेक्षित आहेत, जेणेकरुन त्यांना कामकाज सुलभतेने करता येईल.
आशा सेविका पदासाठी असा करा अर्ज ...
आशा सेविका पदासाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए ते टी विभाग कार्यालयांमध्ये स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमुना विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) यांचेकडे मिळू शकेल. दिनांक ३१ मार्च २०२३ हा अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे. या कामावर आधारित मोबदला तत्वावरील कामासाठी पात्रता धारणा करणाऱया इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.