लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारा : रामदास आठवले
Santosh Gaikwad
September 15, 2023 06:01 PM
मुंबई - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील हेन्री रोडवर संग्रहालय स्वरूपात स्मारक आहे. मात्र लंडनमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्याची येथील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. त्यासोबत लंडन मध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तिथे भारतीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभरण्याची गरज आहे. या मागणीच्या मंजुरीसाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे आपण प्रयत्न करू असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.
लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाला ना.रामदास आठवले यांनी भेट दिली.त्यावेळी लंडन मधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरासामी यांनी रामदास आठवले यांचे स्वागत केले. लंडनमधील भरतीय उच्चायुक्त विक्रम दोरासामी यांच्याशी रामदास आठवले यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.त्यावेळी लंडन मधील विविध मागण्यांसाठी भारत सरकार कडे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुढे आले.
यावेळी लंडनमधील आंबेडकर सेंटर चे गौतम चक्रवर्ती; एच एल विरधी ; कुमार जित आठवले; युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे; इंटरनॅशनल फॉरम फॉर अँटी करप्शन चे उपाध्यक्ष तौसिफ पाशा ;फजल आदी उपस्थित होते.
लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाशेजारीच लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सचे संकुल आहे. याच लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९२३ मध्ये द प्रॉब्लम ऑफ रुपी हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधाला आता १०० वर्षे पूर्ण झाली असून त्या निमित्त येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना रामदास आठवले यांनी केली. तसेच लंडन मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांची एक समिती नियुक्त करुन येथील आंबेडकर सेंटर द्वारे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.
१४ एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, १४ ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध पौर्णिमा, ६ डिसेंम्बर ला महापरिनिर्वाणदिन अश्या महत्वपूर्ण दिनी लंडन मध्ये आंबेडकर सेंटर तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार ने 2 कोटींच्या निधीची तरतूद करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.