ठाण्यात उबाठा गटाला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Santosh Gaikwad July 26, 2024 08:50 PM


ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे शहरातील उबाठा गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यात उबाठा युवा सेनेला ठाण्यात खिंडार पडलं आहे.

ठाणे शहर उबाठा युवा सेनेचे शहर अधिकारी किरण जाधव, उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, बाळकूम शाखा प्रमुख अभिषेक शिंदे , शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा  झेंडा हातात देऊन कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसेच शहरी विकासासाठी महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना या सारख्या जनतेचं कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरीत्या राबवत असल्याने राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
-------