मुंबई, दि. २६ः शेतकरी व जनतेच्या प्रश्नांकडे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कानाडोळा केला आहे. सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकीय वातावरण तापवून समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या सरकारला पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारून महायुती सरकारला बाय बाय करणार, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
राज्यातील सर्व बँकांची बैठक पार पडली. मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी ५० टक्क्यांच्यावर शेतकऱ्यांना कर्ज दिले नाही. सीबील तपासणी शिवाय शेतकऱ्यांना कर्ज दिले जाईल, अशी घोषणाउपमुख्यमंत्री यांनी केली होती. मात्र सीबीलवरून कर्ज नाकारणाऱ्या एकाही बँकेवर सरकारने कारवाई केली नाही, असे दानवे म्हणाले. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले अजित दादा पवार जीएसटी कौन्सिल सारख्या बैठकीला गैरहजर राहतात. शेतकऱ्यांच्या आयुधांवर १८ टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांची सरकारकडून पिळवणूक सुरू आहे. याला सर्वस्व
त्रिमूर्ती सरकार जबाबदार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. पुणे अपघात, नीट घोटाळा, स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला आहे. डोंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात दोनदा स्फोट झाला, या घटनेलाही सरकारचा बेजबाबदारपणा असल्याचा ठपका दानवे यांनी ठेवला.