बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची :- नाना पटोले

Santosh Gaikwad August 07, 2023 06:02 PM


मुंबई, दि. ७ ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुजन समाजाचेही मोठे योगदान आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे, जे लोक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हते त्यांच्या हातात सत्ता गेली असून हेच लोक संविधान संपवण्याचे काम करत आहेत. भाजपा व मोदी सरकार हे बहुजन समाजाला फक्त मतांसाठी वापरून घेतात, अधिकार मात्र काहीच देत नाहीत. बहुजन समाजाला न्याय मिळवायचा असेल तर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही भुमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली. 


जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या  सामाजिक न्याय मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री नारायण मुंडे, विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड, माजी आमदार कल्याण काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस सत्संग मुंडे, जितेंद्र देहाडे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आदी उपस्थित होते. 


मेळाव्याला मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांचे सरकार असताना ओसीबी समाजाचा सविस्तर डेटा बनवला होता पण नंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने तो जाहीर केला नाही. भाजपाच्या मनात पाप आहे, बहुजनांना फायदा होऊ नये ही त्यांची भुमिका आहे. बहुजन समाजाला न्याय मिळावा यासाठी जस्टिस रेणके समितीने देशभरातून अभ्यास करुन केंद्र सरकारला अहवाल सादर केला पण नंतर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्यावर उपसमिती नेमली व बहुजन समाजाला न्याय देण्यापासून वंचित ठेवले. काँग्रेस पक्षच बहुजन समाजाला न्याय देऊ शकतो. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वतः जातनिहास जनगणनेचा प्रस्ताव सादर करून तो मंजूर करुन घेतला, त्यानंतर देशातील इतर राज्यातून तसे प्रस्ताव मंजूर करणात आले. सर्व जातींना न्याय देण्याचा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांचा प्रयत्न आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना केली जाईल असे आश्वासन कर्नाटक विधानसभेच्या निवडणुक प्रचारात राहुलजी गांधी यांनी दिले आहे  असेही पटोले यांनी सांगितले .


 बहुजन समाजाने आता जागे झाले पाहिजे आणि समाजाच्या हिताचे रक्षण करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भुमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. ळाव्याच्या आधी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलेट सवारी केली. यावेळी शेकडो तरुण दुचाकींसह या रॅलीत सहभागी झाले होते.  त्यानंतर पारंपारिक वेशभूषेतील बंजारा महिलांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे स्वागत केले. ‘इंडिया’ का चालत नाही? मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही, मनमानी सरकारविरोधात देशभरातील प्रमुख पक्षांनी आघाडी स्थापन केली असून या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे ठेवण्यात आले आहे. या नावावरही भाजपा आक्षेप घेत आहे. भाजपाला मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया चालते तर मग ‘इंडिया’ का चालत नाही, असा टोला पटोले यांनी लगावला.