पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

Santosh Gaikwad April 11, 2023 07:00 PM

मुंबई :  राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतमालाचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत सापडला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या १३ ते १५ एप्रिल यादरम्यान काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.


 अवकाळी पावसाचा मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे १२ जिल्ह्यांमधील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे मका, हरभरा, गहू, केळी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे नैसर्गिक आपत्ती असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून मुख्यमंत्री शिंदे स्वत: अवकाळी नुकसानीची पाहणी करत आहेत. 


 अवकाळी पावसामुळे नाशिकमधील कळवण, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, सटाणा, नांदगाव, चांदवड आदि तालुक्यात नुकसान झालं आहे. तर शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे अवकाळी नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सोमवारी रात्री सुरगाणा आणि पेठ येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे आणि जिल्हा परिषद शाळांचे पत्रे उडाले आहेत. बुलढाण्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळीच्या फटक्याने टरबूज उत्पादक शेतकरी पूर्णत: उध्वस्त झाला आहे. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातलं पीक जमीनदोस्त झालं आहे. बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, खामगाव या तालुक्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.