नवी दिल्ली : भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्यात नियोजित असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
जितेंद्र सिंह म्हणाले की, सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या, तर इस्त्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान प्रदर्शित करणे, हे या चे उद्दिष्ट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 अवकाश यानाने आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, यामधून यानाची प्रक्षेपण आणि त्यानंतरच्या प्रवासादरम्यान कठोर वातावरणाचा सामना करण्याची क्षमता प्रमाणित केली गेली.
चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा पाठपुरावा करणारे अभियान असल्याचे नमूद करणे उचित ठरेल, असे ते म्हणाले. "चंद्राचे विज्ञान" या संकल्पनेनुसार, चांद्रयानाची चंद्रावर उतरण्याची प्रणाली (लँडर) आणि रोव्हरवरील वैज्ञानिक उपकरणे चंद्राचे पर्यावरण आणि जल-भौतिक गुणधर्मांसह चंद्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सक्षम असतील. त्याच बरोबर, चांद्रयान-3 अभियानात समाविष्ट केलेले आणखी एक प्रायोगिक साधन पृथ्वीच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठीही सक्षम असेल. ज्यामुळे ‘चंद्रावरून विज्ञान’ या संकल्पनेचीही प्रचिती येईल.