आयडियल शालेय बुध्दिबळ स्पर्धेत अरहान खान विजेता

Santosh Sakpal September 10, 2023 11:39 PM

MUMBAI/SHIVNER

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व ग्रुप आयोजित १४ वर्षाखालील आयडियल विनाशुल्क शालेय बुध्दिबळ स्पर्धेत डॉकयार्ड रोड येथील रोझरी हायस्कूलच्या अरहान खानने सर्वाधिक ६ गुण घेत विजेतेपदाला गवसणी घातली. अँटोनीया डिसोझा हायस्कूल-भायखळ्याच्या खुश मोकारीया, समता विद्या मंदिर-घाटकोपरच्या झैद मेमन, सीईएस मायकल हायस्कूल-कुर्ल्याच्या राशी म्हस्के यांचे कडवे आव्हान अरहान खानने विजयी चाली रचून मागे टाकले. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार व क्रीडा संघटक निवृत्ती देसाई, प्रमुख पंच अविनाश महाडिक, क्रीडापेमी चंद्रकांत कडव व साई निकम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

परेल येथील आरएमएमएस सभागृहात ५४ शालेय खेळाडूंच्या सहभागाने झालेल्या मोफत बुध्दिबळ स्पर्धेत अरहान खानने (६ गुण) प्रथम, खुश मोकारीयाने (५ गुण) द्वितीय, झैद मेमनने (४ गुण) तृतीय, राशी म्हस्केने (४ गुण) चतुर्थ क्रमांक पटकाविला. सन्मुख मोहिते, अर्षद खत्री, शिवा जैसवाल, कौशल ठक्कर, अर्णव गाडे, मोहमद सय्यद, सिध्देश गोडसे, विनय गावडे, सिध्दार्थ कांबळे, उत्कर्ष यादव, वरुण चव्हाण, स्वरूप काडे, पृथ्वीराज पिसाळ आदींनी उत्तेजनार्थ पुरस्कार मिळविला. यावेळी शालेय खेळाडूंना दर्जेदार मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व सुनील खोपकर यांना आयडियल क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे क्रीडाप्रेमी चंद्रकांत कडव यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, ओमकार चव्हाण, वेदांत महाडिक यांनी बुध्दिबळ स्पर्धेंच्या पंचांचे कामकाज केले.