घरात बसून उंटावरून शेळया हाकता येत नाही : शिंदे यांचा ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा
Santosh Gaikwad
April 07, 2024 06:52 PM
नागपूर : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. तर तब्बल सात उमेदवारांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून पत्ता कट करण्यात आला. यावरून विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहेत. त्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर देत ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिंदे म्हणाले, फक्त घरात बसून ऊंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत. त्याला प्रत्यक्ष फिल्डवर जावे लागते. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. प्रत्येक नेत्यासह, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री हे ग्राउंड लेवला काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे त्यांनी महायुतीकडे पाहताना दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वत:च्या घरात काय जळतंय ते पहावे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (रविवारी) विदर्भ दौऱ्यावर आहेत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले “आज महाविकास आघाडी म्हणजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्ष ज्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि झेंडा पण नाही. या परिस्थितीचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने विचार कारावा”, असा खोचक टोला ही मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागावाटपावरून शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता “पदाधिकाऱ्यांच्या बैठका निवडणूक काळात सातत्याने होत असतात. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतो आहे. कारण पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला जाऊन काम करत असतात”, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.