मुंबई, दि. ३ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकच जाहिरात विविध पध्दतीने छापण्याचा सपाटा सुरू आहे. वित्तमंत्री अजित पवार प्रसिद्धीपासून दूर आहेत. मात्र, या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांत लढाई सुरू आहे, खोचक टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला. विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या २६० च्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते.
अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. योजनेचा दुसऱ्याच दिवशी शासन आदेश निघाला. योजना जाहीर होताच, मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू झाली. यामुळे ही योजना कोणी आणली, यावरून आता संशय येतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सध्या जाहिरात सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहिराती दिसत नाहीत. परंतु श्रेय लाटण्याचा प्रयत्न महायुतीतीत घटक पक्षांत सुरू झाल्याचे दिसते, असा टोला शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी योजनेची घोषणा केल्यानंतर अनेक बहिणींनी राखी बांधली. राखी पुरती योजना मर्यादित न ठेवता, शेवटच्या लाभार्थांपर्यंत लाभ मिळेल, याकरिता विचार व्हावा. त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढवा, असे आवाहन शिंदे यांनी केले.