मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री शिंदे
Santosh Gaikwad
January 06, 2024 07:45 PM
चिंचवड, दि. ६- (श्रीराम खाडिलकर याजकडून) :- मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक आहे. तसेच मराठी रंगभूमी टिकली पाहिजे यासाठी नवीन नाट्यगृहे बांधली जात असताना जुन्या नाट्यगृहांचीही डागडुजी केली जाईल अशा काही महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केल्या.
अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे तहहयात विश्वस्त आणि स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले.
मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल आणि ज्येष्ठ कलावंतांचे मानधन वाढविणे, तसेच घरांचा प्रश्न सोडविण्याबाबतही विचार केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्यनाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा.शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १००व्या नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे ही गौरवशाली परंपरा लाभल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की देशात नाट्य कलेला दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत.
आजवरच्या वाटचालीत सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ३३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे.
रामकृष्ण मोरे नाट्यगृहात प्रयोग करण्यासाठी आशिया खंडात सर्वाधिक म्हंणजे चौदा हजार वीज बिल येते असे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी लगेचच घोषणा करुन यापुढे पूर्वीसारखेच वीजभाडे द्यावे लागेल आणि सोलरची व्यवस्था करण्याचेही सांगितले. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करतांना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
चिंचवडच्या पवित्र भूमीत नाट्यसंमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून ज्येष्ठ नेते खा.शरद पवार म्हणाले, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. मराठी नाटकाने मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्य केले. नाट्याचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरीतीने होते. लोकरंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे. मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असेही पवार म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनातर्फे नाट्य संमेलनासाठी प्राप्त निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल, असेही श्री. सामंत म्हणाले.
नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ.जब्बार पटेल म्हणाले की मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा असे सांगून मावळते संमेलनाध्यक्ष गज्वी यांनी डाॅ. पटेल यांना शुभेच्छा दिल्या.
प्रशांत दामले यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे, असे दामले म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे कार्यवाह अजित भुरे यांनी केले. भोईर यांनी स्वागतपर भाषणात नाट्य संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.
यावेळी १०० व्या मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेच्या 'नांदी' या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, तर प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन 'रंग निरंतर'चे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि घंटेचे पूजन करून १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला खा. श्रीरंग बारणे, आ. उमा खापरे, आ. अण्णा बनसोडे, आ. अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त,नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईचे पत्रकार प्रथमच झाले नटराजाच्या पालखीचे भोई
सकाळी चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरापासून नाट्यदिंडी निघाली. नटराज प्रतिमा आणि विष्णुदास भावे यांचे साहित्य त्यात ठेवलेले होते. ही दिंडी भैरवनाथ मंदिर गांधीपेठ चाफेकर चौक भोई अळी पावर हाऊस तानाजी नगर काकडे पार्क असा मार्ग क्रमित मुख्य सभा मंडप असलेल्या मोरया गोसावी क्रीडांगणात आली. या दिंडीचं विशेष असं की यंदा या दिंडीचे भोई होण्याचे भाग्य श्रीराम खाडिलकर यासह मोजक्या पत्रकारांना लाभले असे केल्या 99 वर्षात कधी घडले नव्हते हे या घटनेचे विशेष म्हणून सांगावे लागेल. आणखी एक योगायोग म्हणजे आज पत्रकार दिन आहे त्यामुळे पत्रकारांचंही नाट्यसृष्टीत असलेलं योगदान या पालखी उचलण्याच्या कृतीमुळे अधोरेखित झाले. विशेष म्हणजे आजच्या पत्रकार दिनानिमित्त प्रथमच नाट्यसंमेलनात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला फुले वाहून अभिवादन केले गेले.
*****