मुंबई दि.19:गणेशोत्सवानिमित्त बाजारामध्ये असंख्य प्रकारची मिठाई, गोड पदार्थ तसेच खव्याचे पदार्थ उपलब्ध आहेत. हे पदार्थ भेसळयुक्त किंवा योग्य दर्जाचे नसतील तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे जनतेने अन्नपदार्थांच्या गुणवतेसंदर्भात जागरूक राहावे तसेच त्यांच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात,असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरामबाबा आत्राम यांनी केले आहे.
मिठाई, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ खाण्यास योग्य आणि सुरक्षित असावेत, यासाठी अधिक सजग राहून जास्तीत जास्त कारवाई सणासुदीच्या काळात करावी, असे निर्देश ही मंत्री धर्मरामबाबा आत्राम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहे.
गणेशोत्सव काळात भेसळयुक्त पदार्थांची गुणवत्ता कशी ओळखावी, सदोष उत्पादनासंदर्भात कोणाकडे तक्रारी कराव्यात, याची माहिती सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भात मुंबईकरांना माहिती उपलब्ध करून दिली आहे.त्याचा जनतेनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही मंत्री धर्मरामबाबा आत्राम यांनी केले आहे.