अमरावती लोकसभेचा उमेदवार कोण ? नवनीत राणा - आनंदराव अडसूळ यांचा दावा
Santosh Gaikwad
March 04, 2024 06:23 PM
नागपूर : अमरावती लोकसभेवर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी सुरुवातीपासूनच दावा केला आहे. परंतु, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीही याच मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदार संघ हा भाजपच्या वाटयाला जाणार कि शिंदे गटाच्या याकडे लक्ष वेधले आहे. राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही संकेत मिळत आहेत त्यामुळे अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवार कोण ? नवनीत राणा कि आनंदराव अडसूळ अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत आता खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमरावती लोकसभेबाबत जो निर्णय व्हायचा आहे, तो होणारच आहे, असे राणा यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.
खासदार नवनीत राणा या आज (ता. 04 मार्च) नागपूरमध्ये आयोजित केलेल्या भाजपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मी आपल्याला इतकेच सांगू शकते की मी भाजपाच्या मंचावर असणार आहे. बाकी कुठला पक्ष असणार आहे ते मला माहीत नाही. मात्र मी त्या मंचावर असणार आहे आणि युवकांना कसे मार्गदर्शन केले जाते ते मी पाहणार आहे. लोकसभेचे मैदान हे नवनीत राणाचे एकटीचे नाही. कोणीही आपली मागणी ठेवू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आहे. त्यानुसार दावा करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे, मात्र शेवटी जो निर्णय होईल तो होणारच आहे. त्यामुळे आता नवनीत राणा भाजपाकडून उमेदवारी मिळाली तरच निवडणूक लढवणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर, भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या मुद्द्यावरून मी चर्चेत आहे, हे चांगले आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद असतो, त्यांच्याशी चर्चा करुनच आम्ही पुढे जात असतो. तर, मी अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे. केंद्रातही त्यांनाच पाठिंबा दिला आहे. तर राज्यात रवी राणांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. आमचा तो पाठिंबा कायम राहणार आहे, असेही नवनीत राणा यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी महाघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी अचानकपणे आपली भूमिका बदल भाजपा-शिवसेना युतीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. तर ज्या महाआघाडीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या, त्यांच्याच विरोधात बोलू लागल्याने अमरावतीतील राजकीय वातावरण तापले होते. परंतु आता तर राज्यातीलच राजकीय समीकरण बदलल्याने अमरावतीतील राजकीय समीकरणही बदल्याचे पाहायला मिळत आहे.