हिंदूत्व सोडले आता भगव्या झेंड्याची अॅलर्जी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Santosh Gaikwad
May 18, 2024 06:28 PM
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी हिंदूत्व सोडले. आता तर त्यांना शिवरायांचा भगवा झेंडा, प्रभू रामचंद्राचा भगवा आणि वारकऱ्यांच्या भगव्या झेंड्याची अॅलर्जी झालीय कारण तुमच्या प्रचार रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरात पहिल्या चार टप्प्यात महायुतीला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आपले सरकार येण्यापूर्वी सगळी कामे बंद होती. मेट्रो कारशेड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईचे सौंदर्यीकरण असे अनेक प्रकल्प महायुतीने सुरु केले. दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी रस्त्यावर केवळ डांबर टाकायचे आणि त्यात पैसे खायचे.यासाठी महापालिकेचे दहा वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले होते. पुढील २५ - ३० वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईसाठी इतके वर्ष काय केले, याचा हिशेब मुंबईकर येत्या निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. ज्या उपक्रमातून मुंबईकरांना लाभ होत असेल तर हा मुख्यमंत्री ते करायला तयार आहे, असे ते म्हणाले. पुनर्विकास रखडलेल्या ३८८ इमारतींसाठी नगर विकास विभागाला वेगळा नियम करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.
ही निवडणूक देश घडवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला जगभरात मानसन्मान मिळवून दिला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी यामिनी जाधव यांना निवडून द्यायचे आहे. आपल्या सरकारमध्ये भेदभाव नाही. हिंदू असो वा देशभक्त मुसलमान सर्वांना समान वागणूक दिली जाते. मात्र उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतात. त्यांच्या रॅलीमध्ये मुंबई बॉम्बस्फोटीतील आरोपी इक्बाल मुसा फिरतो. याकूब मेनन यांच्या कबरीचे उदात्तीकरण होतेय. मुंबई हल्ल्यातील शहिद पोलीसांचा अपमान केला, अशा ढोंगी लोकांना निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.