…यासाठी मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
Santosh Sakpal
May 07, 2023 08:10 PM
कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह इतर पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. एकबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी रिंगणात उतरले असून दुसऱ्याबाजूला काँग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी जोरदार प्रचार करत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. तसेच रविवारी, ७ मार्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही कर्नाटकात दाखल झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे. बोंबलून झालं असेल आणि हिंमत असेल तर मिंध्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला हारवा असं आवाहन लोकांना करायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे शनिवारी झालेल्या महाडच्या सभेत म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
…मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कर्नाटक पोहोचल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी भाजप शिवसेना युतीचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकला आलो आहे. महाराष्ट्रात जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं समविचारी सरकार आहे तसं कर्नाटकातही समविचारी सरकार आहे. तसंच कर्नाटकमध्येही डबल इंजिन सरकार यावं यासाठी मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो आहे. पंतप्रधान मोदींच्या रोड शोला लाखोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. कर्नाटक निवडणूक भाजप मोठ्या बहुमतानं जिंकणार असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.