ठाण्याच्या घटनेची आरोग्य संचालकांकडून चौकशी : मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश !

Santosh Gaikwad August 13, 2023 09:23 PM


ठाणे : ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिले आहेत. 


 मुख्यमंत्रयांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. व आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल.


रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत असे शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 


 ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की १८ रूग्णांचा मृत्यू झाला असूनए यामध्ये १० महिला आणि आठ पुरुषांचा समावेश असून त्यापैकी सहा ठाणे शहरातील , चार कल्याणमधील, तीन शहापूर, भिवंडी, उल्हासनगर आणि गोवंडी (मुंबईतील) प्रत्येकी एक आहेत. तर एक रुग्ण अन्य ठिकाणचा असून एक अज्ञात आहे. मृतांचे वय १२ ते ५० वर्षांच्या दरम्यान आहे.


पत्रकार परिषदेला संबोधित करताना बांगर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीबाबत माहिती घेतली असून स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या समितीचे अध्यक्ष आरोग्य सेवा आयुक्त असतील. यासोबतच जिल्हाधिकारी, नागरी प्रमुख, आरोग्य सेवा संचालक यांचा यात समावेश असेल. संबंधित समिती दोन दिवसात चौकशी करून अहवाल सादर करणार असून त्यानंतर दोषींवर कारवाई होणार आहे. 


मृतांची नावे पुढीलप्रमाणे---     


१. गीता (अनोळखी)             

२. झायदा शेख  (६० वर्ष) 

३. सुनीता इंदुलकर (७० वर्ष)

४. ताराबाई हरी गगे (५६ वर्ष)

५. भानुमती पाढी (८३ वर्ष)

६. सनदी सबिरा मोहम्मद हुसेन (६६ वर्ष)

७.निनाद रमेश लोकूर (५२ वर्ष)

८.भास्कर भिमराव चाबूस्वार (३३ वर्ष)

९.अमरिन अब्दुल कलाम अन्सारी (३३ वर्ष)

१०. अशोक जयस्वाल (५३ वर्ष)

११. भगवान दामू पोतदार (६५ वर्ष)

१२. अब्दुल रहीम खान (५८ वर्ष)

१३. सुनील तुकाराम पाटील (५५ वर्ष )

१४. ललिताबाई शंकर चव्हाण (४२ वर्ष)

१५. चेतक सुनील गोडे (४ वर्ष)

१६. अशोक बाळकृष्ण निचाल (८१ वर्ष)

१७. नूरजहाँ खान (६० वर्ष)

१८. कल्पना जयराम हुमाने (६५ वर्ष)