को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन कॅरम स्पर्धेत संध्या बापेरकर, गितेश कोरगावकर विजेते

Santosh Sakpal February 05, 2024 03:55 PM

 

मुंबई NHI : को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या आंतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या कॅरम स्पर्धेमध्ये महिला एकेरी गटात म्युनिसिपल बँकेच्या संध्या बापेरकरने आणि पुरुष एकेरी गटात गितेश कोरगावकरने विजेतेपद पटकाविले. महिला दुहेरीचे विजेतेपद अपना बँकेच्या गौरी कोरगावकर-साक्षी सरफरे जोडीने तर पुरुष दुहेरीचे विजेतेपद सिटी बँकेच्या शिशिर खडपे-संजय मकरे जोडीने जिंकले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ आणि महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष प्रमोद पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर-पश्चिम येथील युनियन सभागृहात संपन्न झाला.

महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. बँक पुरस्कृत कॅरम स्पर्धेत महिला गटाची संध्या बापेरकर विरुद्ध उषा कांबळे यामधील लढत विलक्षण चुरशीची झाली. उषा कांबळेने पहिला सेट नील देत दुसऱ्या सेटचा प्रारंभ देखील ३-० अशा आघाडीने केला. परंतु त्यानंतर संध्या बापेरकरने जोरदार मुसंडी मारीत १२-३ असा विजय मिळवीत १-१ अशी बरोबरी साधली. विजयाचे पारडे दोलायमान झालेल्या तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये अखेर संध्या बापेरकरने ०-२०, १२-३, ८-७ अशी बाजी मारली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद गितेश कोरगावकरने पटकाविताना कोकण बँकेच्या वासिम खानचे आव्हान १६-११, १०-६ असे संपुष्टात आणले.

निर्णायक सामन्यामध्ये महिला दुहेरीत गौरी कोरगावकर-साक्षी सरफरे जोडीने म्युनिसिपल बँकेच्या संगीता बेम्बडे-मानसी पाटील जोडीचा ७-३, ९-८ असा आणि पुरुष दुहेरीत शिशिर खडपे-संजय मकरे जोडीने चेंबूर बँकेच्या सुशांत सावंत-प्रफुल जाधव जोडीचा १९-५, २५-० असा पराभव केला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, ठाणे युनियनचे सरचिटणीस प्रदिप पाटील, सहखजिनदार जनार्दन मोरे, अन्य पदाधिकारी भार्गव धारगळकर, अमूल प्रभू, प्रकाश वाघमारे, समीर तुळसकर, अशोक नवले, प्रविण शिंदे, अमरेष ठाकूर, धर्मराज मुंढे आदी मंडळी कार्यरत होती.