विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लक्ष्य: के. सी. वेणुगोपाल
Santosh Gaikwad
July 20, 2024 04:24 PM
*प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न*
मुंबई, दि. १९ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने २३७ जागा जिंकून भाजपाला रोखले आहे. आजही देशातील वातावरण इंडिया आघाडीचेच असून महाराष्ट्रात काँग्रेस व मविआसाठी चांगले वातावरण आहे. काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तर भाजपा मात्र धनदांडग्यांबरोबर आहे हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुक होत आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस मविआसाठीचे लक्ष्य आहे आणि ही निवडणूक जिंकावीच लागेल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करताना के. सी. वेणुगोपाल बोलत होते ते पुढे म्हणाले की, सर्वांनी एकजुटीने मतभेद विसरून जातीय धर्मांध शक्तींना पराभूत करायचे आहे. भाजपच्या राज्यात सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, अल्पसंख्यांक आदिवासी कोणीही सुखी आणि सुरक्षित नाही. जनतेचे हित जोपासण्यासाठी भाजपाला सत्तेतून खाली खेचलेच पाहिजे.
यावेळी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, निवडणूक ही एक लढाई आहे, ती व्यवस्थित लढली तरच विजय प्राप्त होतो. लोकसभेत विजय मिळवला म्हणून अतिआत्मविश्वास बाळगू नका, भरपूर मेहनत करावी लागणार आहे. राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मविआचे सरकार आणा असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी संघटनात्मक कार्यक्रमांची रुपरेषा आखलेली आहे. २३ जुलै रोजी जिल्हा कमिटींच्या बैठकांचे आयोजन केले आहे. २५ ते ३० जुलै ब्लॉक मिटिंग होतील तर १ ते १० ऑगस्ट दरम्यान बुथ लेवलच्या बैठका आयोजित करुन संघटन मजबूत करण्यावर भर द्यायचा आहे. लोकसभेला जसे नवे चेहरे दिले तसेच विधानसभेलाही नवीन चेहरे दिले जातील, महिलांनाही संधी दिली जाईल. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांची २० ऑगस्ट रोजी जयंती आहे या दिवशी काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जून खर्गे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली असून या सभेतच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल असेही चेन्नीथला म्हणाले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक, उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे, विरोधी पक्षनेचे विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.