मुंबई, दि. ११ मे २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.२०१४ च्या निवडणुकीत २ कोटी रोजगार, प्रत्येकाला १ लाख रुपये देणार, महागाई कमी करणार अशा गॅरंटी दिल्या पण त्यातील एकही गॅरंटी पूर्ण केली नाही.नरेंद्र मोदी आता जनतेच्या प्रश्नावर बोलत नाहीत. देश आज एका कठीण प्रसंगातून जात आहे, लोकशाही, संविधानाला मोठा धोका आहे. भाजपा संविधान बदलण्याची भाषा करत आहे परंतु संविधान बदलण्याआधी जनता भाजपालाच बदलेल आणि ४ जुनला भाजपाचा सर्वात मोठा पराभव झालेला दिसेल, असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
चांदिवली येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की,नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला नकली म्हणतात, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरतात आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना सोबत येण्याचे आवाहन करतात. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आणि त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेतले. इलेक्टोरल बाँडमधून नरेंद्र मोदींनी कोट्यवधी रुपयांची वसुली केली आणि आरोप मात्र काँग्रेस पक्षावर करत आहेत.भाजपाने बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला पण महिला अत्याचारावर एक शब्दही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, हाथरस उन्नाव मध्ये अत्याचार झाले. कर्नाटकात प्रज्वल्ल रेवन्नाने शेकडो महिलांवर अत्याचार केले पण नरेंद्र मोदी त्यावर गप्प आहेत. राजकीय पक्ष फोडणे, धार्मिक तणाव निर्माण करणारे विधाने करणे हे जनतेला आवडलेले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होणार असे चित्र दिसत आहे.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, देश संकटातून जात आहे, संविधान, लोकशाही संकटात आहे, गरिब, कामगार संकटात आहे, त्यांना न्याय देण्याची लढाई राहुल गांधी व काँग्रेस पक्ष लढत आहे. गांधी कुटुंबातील लोक देशासाठी शहिद झाले. देशाला वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत. राहुल गांधी यांनी देशासाठी देशभर पदयात्रा काढली. या लढाईत मजबुतीने सहभागी झाले पाहिजे. देशाची लोकशाही, संविधान वाचवण्याची हि लढाई आहे. चांदिवली भागातील घरा-घरात जावा व काँग्रेसचा विचार पोहचवा. तीन टप्प्यातील मतदानात काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्व समाज घटकांनी आता दिल्लीतील भाजपाचे सरकार तडीपार करण्याचा संकल्प केला आहे आणि ४ जूननंतर अच्छे दिन येणार आहेत असेही नसीम खान म्हणाले.
वर्षा गायकवाड यांच्या प्राचाराचा धडाका सुरु असून आज काँग्रेस नेते खासदार शशी थरूर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे विधानसभा मतदारसंघातील एसएनडीटी महाविद्यालय सिग्नल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. सकाळी सांताक्रूज पूर्व भागात रोड शो करण्यात आला तसेच सिंधी समाजातील लोकांशी संवाद साधला. कुर्ला पश्चिम येथील पाईपलाईन रोड येथे दुपारी जाहीर सभा घेण्यात आली. कलिना येथील केंद्रीय निवडणूक कार्यालयात एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.