जनसंवाद पदयात्रेतून नाना पटोलेंची सरकारवर टीका
Santosh Gaikwad
September 03, 2023 05:49 PM
मुंबई, दि. ३ सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आजपासून विभाग निहाय राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून विदर्भातील जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी पटोले यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील ईडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, महिला तरुण कामगार असे सर्वच समाजघटक अडचणीत आले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागातील खरिपाचे पीक वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. पण सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही. त्यामुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली आहे. त्यामुळे जनतेशी संवाद साधण्यासाठी व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी काँग्रेसकडून जनसंवाद पदयात्राक काढण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून विदर्भातील जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी आमदार अमर काळे, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा चारुलता टोकस, नाना गावंडे, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, काँग्रेस नेते शेखर शेंडे, प्रमोद हिवाळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले की राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याला कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची लूट सुरू असून भरती परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर, महिलांवर आणि लहान मुलावर या येड्यांच्या सरकारने लाठी हल्ला केला व हवेत गोळीबार केला. केंद्र सरकारने आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटू शकतो मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाशक्तीच नाही. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये राज्यभरात विविध ठिकाणी सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यात आल्या. आताही इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये सुरू असताना निष्पाप मराठा बांधवांवरती लाठी हल्ला करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न केला. जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला हा सरकार पुरस्कृत असून सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस अमानुषपणे असा हल्ला करू शकत नाहीत. जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी हे सरकार राज्यात जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राज्याला मणिपूर प्रमाणे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर शहरातून जनसंवाद पदयात्रा काढली. यावेळी नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, गिरीश भाऊ पांडव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्वांनी नागपूर शहराच्या विविध भागातून पदयात्रा करून नागपूरकरांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते तसेच कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथून जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली. त्यांनी सकाळच्या सत्रात रामपूर, माणगाव, शिव नगर, मालेवाडी, घुलेवाडी, निटूर आणि कोवाड या ठिकाणी पदयात्रा केली. त्यांनी दुपारच्या सत्रात आजरा तालुक्यातील हंडेवाडी, कोळिंद्रे किणे, शिरसंगी बुरुडे व आजरा या गावांमध्ये पदयात्रा करून जनतेशी संवाद साधून लोक भावना जाणून घेतल्या.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे सोमवारी सकाळी अहमदनगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यापासून उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निंदनीय घटनेनंतर मराठवाड्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज पासून मराठवाड्यात निघणारी नियोजित जनसंवाद यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. या यात्रेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.