वडिलांचं निधन, काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचीही प्रकृती बिघडली; एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला
Santosh Sakpal
May 28, 2023 04:31 PM
चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेवर खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. खासदार धानोरकर यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत आहे. पुढील उपचारासाठी धानोरकर यांना नागपूरहून विशेष एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला हलवले जाणार आहे. कालच बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचं निधन झाले. नारायणराव धानोरकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
बाळू धानोरकर यांना काल संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आजारपणाविषयी कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून काळजी व्यक्त केली जाऊ लागल्याने खासदार धानोरकर यांनी ट्वीट करत आपल्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे.
'काल शनिवार दिनांक २७ मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परंतु आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार करून विश्रांती घेणार आहे,' असं बाळू धानोरकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर हे दीर्घ आजाराने ग्रस्त होते. काल वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.