दावोस दौ-यावरून वाद रंगला : आदित्य ठाकरेंचे आरोप, उद्योग मंत्र्यांचे स्पष्टीकरण

Santosh Gaikwad January 15, 2024 08:05 PM

 

मुंबई, दि. १५ः दावोस येथील आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्योगमंत्री यांच्यासह ५० जणांचे शिष्टमंडळ जाणार आहे. त्यासाठी कोटयावधी रूपयांचा खर्च होणार असून  हि जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आहे, असा आरोप शिवसेना (ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी करत सरकारला धारेवर धरले. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या आरोपावर स्पष्टीकरण देत हा दौरा कमी खर्चात होईल, एकाही पैशाचा अपव्यय होणार नाही असा खुलासा केला आहे. त्यामुळे दोवोसच्या दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्रात वाद रंगल्याचे दिसून येत आहे. 

दावोस येथील आर्थिक परिषदेला १५ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. १९ जानेवारीपर्यंत ही परिषद चालणार आहे. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसह ५० जण दावोसला जात आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी इतक्या लोकांना परवानगी दिली आहे का, असा सवाल मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारला विचारला. संक्रात असल्याने 'आज गोड बोलायचा दिवस परंतु, सत्य सुद्धा बोलायला हवे, असे सांगत मंत्र्यांच्या दौऱ्याचा लेखाजोखा मांडला. परराष्ट्र मंत्र्यांनी केवळ १० जणांना दावोसला जाण्यास परवानगी दिली. सरकार मात्र वऱ्हाड घेऊन दावोसला निघाल्याचा आरोप करत सरकारची दौऱ्यापूर्वी कोंडी केली. गेल्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २८ तासांत ४० कोटींचा दावोस दौऱ्यावर खर्च केल्याचे ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंंत्री, खासदार, माजी खासदार, एमएसआरडीसीचे अधिकारी, ओएसडी, उपमुख्यमंत्र्यांचे ओसडी आदी ज्यांना गुवाहाटीला नेता आले नाही, अशा लोकांना दावोसला घेऊन जात आहेत, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. केंद्र सरकारचा यावर अंकूश नाही. दलालांसह बिनकामांची ५ ते ६ लोक दौऱ्यात आहेत. विशेष म्हणजे ५० लोकांत कोणीही बिझनेसमेन नाही. त्यामुळे हा खर्च स्वतः करणार असले तरी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला याची माहिती आहे का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. या दौऱ्यात सर्वसामान्यांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप ठाकरेंनी करत, दावोस आणि रेसकोर्सवर भाजपने यावर भूमिका स्पष्ट करावी मागणी केली. 

मोठी गुंतवणूक राज्यात आणू - मंत्री उदय सामंत 
दावोसला जाणारे शिष्टमंडळ मोठे असले तरी खर्च कमी आहे. एकाही पैशाचा अपवव्यय होणार नाही. उलट मोठी गुंतवणूक मुख्यमंत्री राज्यात आणतील, असा खुलासा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. लंडनला वाघ नख आणण्यासाठी गेल्यानंतर ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचा टोला सामंत यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. मागील सरकारच्या काळात दावोसमध्ये उद्योग मंत्र्यांसह पर्यटन मंत्री, त्यांचा ओसडी गेले. ५० हजार कोटींचा करार केला. तो करार आणि उद्योजक कुठे सापडत नसल्याचा खोचक चिमटा काढला. सुप्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ बॉम्ब ठेवलेला सचिन वाजेला पोलीस सेवेत कोणी घेतले, असे प्रश्न उपस्थित केले. अदानीवरून सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवली.  

घोड्यांच्या तबेल्यासाठी १०० कोटींचा खर्च - आदित्य  

मुंबईतल्या ऐतिहासिक महालक्ष्मी रेसकोर्स क्लबमधील सदस्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. २२६ एकरची जागा विभागली जाणार आहे. १२० एकर जागा थीम पार्कसाठी राखीव आहे. उर्वरित जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव घातला जातो आहे. तर घोड्यांच्या तबेल्यासाठी १०० कोटींचा खर्च केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.