मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढली असल्याने मुंबईतही येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्टेशन, बेस्ट बस, मॉल आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा पालिकेचा विचार करत आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत परवानगी दिल्यानंतरच पालिका याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे . राज्यात आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,०१६ इतकी झाली आहे. मुंबईत एप्रिल आणि मेअखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून न सर्व २४ वॉर्डमध्ये 'वॉर्ड वॉर रूम' पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तसेच केईएम, शीव, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह महत्त्वाच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये 4 हजार बेड ऑक्टिव्ह करण्यात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेडचे 'कोविड वॉर्ड' तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे समजते.