राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी

Santosh Gaikwad August 31, 2024 11:00 PM


लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाकडून अटक वारंट जारी करण्यात आले आहे. सोळा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचे पकड वॉरंट जारी केलंय. महामंडळाची बसगाडीची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. याबाबतचे हे प्रकरण आहे.

 मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांना निलंगा येथील दुसरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शुक्रवारी  (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले आहे. यामुळे राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. यापूर्वी ही काही वर्षांपूर्वी ते याच प्रकरणी निलंगा न्यायालयात हजर झाले होते. सोळा वर्षापूर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ तोडफोड  केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

 निलंगा येथील मनसे कार्यकर्त्यांनी  2008 मध्ये  उदगीर मोडवरती महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आठ जणावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांचा समावेश होता. यापूर्वी निलंगा न्यायालयाने जामिन रद्द केल्याने त्यांना निलंगा येथील न्यायालयात हजर रहावे लागले होते.  वकीलांनी राज ठाकरे यांना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणे शक्य नसल्याने हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही दिला होता. मात्र तारखेला हजर राहात नसल्यामुळे न्यायालयाने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक वॉरंट जारी केले आहे. 

 राज ठाकरे आणि मनसेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख अभय सोळुंके हजर राहत नसल्यामुळे त्यांना पुन्हा (अजामीनपात्र) अटक वॉरंट जारी केले असल्यामुळे पोलिसांना त्यांना निलंगा न्यायालयात हजर करावे लागणार आहे. येथील न्यायालयाने राज ठाकरे आणि अभय सोळूंके यांना हजर करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सहा वर्षानंतर राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयात हजर रहावेच लागणार आहे. चिथावणीखोर भाषण दिले म्हणून ते या प्रकरणातील आठवे आरोपी आहेत.