मुंबई : शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या आरोपाप्रकरणी ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काही मजकूर छापून आला होता. या मजकुरावर राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या मजकुराविरोधात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे. मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे. भाजपला ठाकरे गटाच्या हातून सत्ता हिसकावयाची आहे. त्यासाठी मुंबईत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भाजप-शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष वाढताना दिसतोय. दोन्ही बाजूने एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे वेगवेगळ्या मुद्द्यांप्रकरणी दोन्ही बाजूने न्यायालयीन लढाई देखील लढली जातेय. त्यामुळे या समन्सनंतर ठाकरे राऊत कोर्टात हजर होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.