अजित पवारांचे निधी वाटपात राजकारण ? : ठाकरे गट,काँग्रेसकडून टीका !
Santosh Gaikwad
July 23, 2023 10:26 PM
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याची सूत्रं हाती घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधी वर्षाव करीत २५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रवादीसह शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातल्या विकासकामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या या निधी वर्षावावर ठाकरे गट आणि काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत टीका केलीय. त्यामुळे अजित पवारांच्या निधी वाटपात राजकारण करण्यात आल्याची चर्चा राज्यात रंगलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून अजित पवार पक्षातील काही आमदारांसोबत सत्तेत सामील झाले. अर्थखात्याची सूत्रं हाती आल्यावर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधी वर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. तर, पुरवणी मागण्यांमध्ये विकासकामांसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देवळाळीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांना ४० कोटी निधी मंजूर केला आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांना सहानुभूती मिळतेय, त्यामुळे आमदारांनी साथ सोडू नये, यासाठी देखील अजित पवारांनी हे निधीवाटप केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबरच अजित पवारांनी शिंदे गटातील आमदारांनाही विकासनिधी मंजूर करत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही अजित पवार यांनी निधीचे वाटप केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश आहे. मात्र, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना अजूनही निधी दिलेला नाही.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना कोणताही निधी दिला गेला नाही असा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर टीका केलीय. दानवे यांनी अजित पवारांची एका वृत्तपत्राची निधी वाटपाची बातमी ट्वीट करीत शिंदे गटाला टोला लगावला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'ज्यांच्या मांडीला मांडी नको, म्हणून बाहेर पडलेल्या ४० मंडळींच्या मांडीवरच आता तेच ९ जण येऊन बसले. ते पण एकदम ठासून! हाच या कहाणीचा सध्याचा 'अर्थ' आहे.' अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही निधी वाटपावरून टीका केली आहे. राऊत म्हणाले, या देशात जो आमच्याबरोबर येईल मग भ्रष्ट असेल दुराचारी असेल तरी त्यालाच फक्त विकास कामासाठी निधी दिला जाईल, हे धोरण अतिशय घातक आहे असे राऊत यांनी सांगितले.
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही निधी वाटपावर टीका केलीय. राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला आहे. उध्दव ठाकरे आणि काँग्रेसच्या एक देान नेत्यांना निधी दिला आहे बाकींना निधी दिलेला नाही असे ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच निधी दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिला नाही. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनाही दिला आहे. इतरही काही आमदारांना निधी दिला आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी दिला, असं म्हणता येणार नाही.