व्हायरल व्हिडीओवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

Santosh Gaikwad September 13, 2023 07:41 PM


मुंबई, दि.१३ः मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारच्या पत्रकार परिषदेचा एक व्हायरल व्हिडीओ समोर आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून विरोधकांचा हा खोडसाळपणा असल्याचा आरोप केला. शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून शिंदे यांच्यावर जोरदार घणाघात करताना, हीच ती गद्दार वृत्ती, असे म्हणत ट्विट करत निशाणा साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मराठा आंदोलकांबद्दल ही यांची संवेदनशीलता? खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! गेले दीड वर्ष महाराष्ट्र या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेत आहोत. या शिंदे- भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी ज्यांनी घडवले, वाढवले, पदे दिली, सत्ता दिली. त्यांचे हे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार? असे ते म्हणाले. तसेच गद्दारी आणि खोके - धोके देवून महाराष्ट्रातील नागरिकांवर सरकार लादल्याची जोरदार टीका केली.
-------