चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी पराभव केला. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने ३ बळी घेतले. आजच्या पराभवानंतर गुणतालिकेत तळाला असलेली दिल्ली जवळपास प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडली आहे.
चेन्नई : आयपीएल २०२३ च्या ५५ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २७ धावांनी पराभव केला. एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत आठ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकांत ८ गडी गमावून १४० धावाच करू शकला.
मात्र, या पराभवानंतर डेव्हिड वॉर्नरच्या संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचे १५ गुण झाले आहेत. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यानंतर गुणतालिकेत कोणताही बदल झालेला नाही. गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स शेवटच्या स्थानावर आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्जने नंबर- २ वर आपले स्थान मजबूत केले आहे.
१६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. चेन्नईकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या दीपक चहरने दुसऱ्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. दिल्लीच्या कर्णधाराने दोन चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. चहरचा बॅक ऑफ लेन्थ बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, वॉर्नर कव्हर एरियात तो मारायला गेला आणि रहाणेने सोपा झेल घेतला. चहरने तिसऱ्या षटकात दिल्लीची दुसरी विकेट घेतली. ११ चेंडूत १७ धावा करणाऱ्या सॉल्टला अंबाती रायुडूने झेलबाद केले.
पाथिरानाची शानदार गोलंदाजी
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दिल्लीची तिसरी विकेट पडली. मिचेल मार्श ५ धावांवर धावबाद झाला. यानंतर मनीष पांडे आणि रिले रुसो यांच्यात चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी झाली. १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मथीशा पथिरानाने ही भागीदारी तोडली. त्याने मनीष पांडेला एलबीडब्ल्यू आऊट केले. पांडेने २९ चेंडूत २७ धावा केल्या. पंधराव्या षटकात जडेजाने रुसोला पाथिरानाकडून झेलबाद केले. रुसोने ३७ चेंडूत ३५ धावांची संथ खेळी खेळली.
अक्षरने २१ धावा केल्या
१८व्या षटकात पथिरानाने अक्षर पटेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने १२ चेंडूत २१ धावांची खेळी केली. रहाणेने अक्षरचा झेल घेतला. रिपल पटेल १९व्या षटकातील ५व्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने १६ चेंडूत ९ धावा केल्या. शेवटच्या षटकात पथिरानाने ललित यादवला क्लीन बोल्ड केले. ललितने ५ चेंडूत १२ धावा केल्या. अमन खान २ धावा करून नाबाद राहिला. चेन्नईकडून पथिरानाने ३ बळी घेतले. तर दीपक चहरने २ आणि रवींद्र जडेजाने १ बळी घेतला.
चेन्नईसाठी या सामन्यात एकाही फलंदाजाने ३० धावांचा टप्पा ओलांडला नाही. शिवम दुबेने १२ चेंडूत सर्वाधिक २५ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने २४, अंबाती रायडूने २३, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणेने २१-२१ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने १० आणि मोईन अलीने सात धावा केल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात वेगवान धावा केल्या. त्याने नऊ चेंडूत २० धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने तीन आणि अक्षर पटेलने दोन विकेट घेतल्या. खलील अहमद, ललित यादव आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक यश मिळाले.