लोकसभेप्रमाणे विधानसभेत घडू नये यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंवाद वाढवावा : फडणवीस 

Santosh Gaikwad August 11, 2024 10:32 PM


अकोला :  महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह पेरून भाजपचा मत टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. आरक्षण काढून टाकू, संविधान बदलणार अशा खोट्या प्रचारामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. लोकसभेप्रमाणे विधानसभेत घडू नये म्हणून भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संवादाच्या माध्यमातून समाजाला सोबत आणावे. त्यांच्यासोबत जनाधार वाढवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात जनसंवाद सभा रविवारी झाली. यात मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार संजय कुटे, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार वसंत खंडेलवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.


फडणवीस म्हणाले,  लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ४३.९ टक्के तर महायुतीला ४३.६ टक्के मतदान झाले. या मतांच्या टक्क्यांत केवळ ०.३ इतका फरक आहे. केवळ दोन लाख मते कमी मिळाली.


अकोल्यात सध्या पाचपैकी चार आमदार भाजपचे आहेत. पाचही आमदार भाजपचे रहावे यासाठी प्रयत्न करा, भाजपपासून दुरावलेल्या सर्वसामान्य मतदारांना जोडा, जनसंवाद वाढवा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सामाजिक क्षेत्रातील व सामान्य नागरिकांशी कनेक्ट होऊन जनाधार वाढवावा, अशा सूचना दिल्या.